About Us
Our Story
“झालो जरी एका भाकरीच्या तुकड्यासाठी महाग, तरी जिद्द आम्ही हरली नाही… होती पंखामध्ये ताकद इतकी भय परिस्थितीचे कधी बाळगले नाही..”
ही शब्दरचना सुचली ती आमच्या नितीन सरांना पाहून..!
अत्यंत खडतर बालपण, परिस्थितीने प्रत्येक वेळी आखलेला एक नवा डाव. पण त्यांच्या या खडतर बालपणात एक खंबीर स्त्री उभी होती ती म्हणजे त्यांची आई… चिमणी कशी एका दाण्यासाठी दिवसभर वणवण फिरते आणि फिरून कष्ट करून पंख थकले तरी पहिला घास आपल्या पिल्लांना भरवते…कात्याकुट्यांची, वादळवाऱ्याची तमा न बाळगता परिस्थितीशी झुंज देणे व कायम स्वावलंबी राहणे ही त्यांच्या आईची शिकवण.. या संस्काराची छाप आम्हाला आमच्या सरांमध्ये कायम दिसते.
पण परिस्थिती एवढ्यावर थांबली नाही, ते इयत्ता चौथी मध्ये शिकत असताना त्यांचे वडील अचानक दृष्टिहीन झाले, अशा वेळी नातेवाईकांचा कोणाचाही आधार मिळाला नाही , पण आईने जिद्द सोडली नाही, पडेल ते काम करण्याची आणि कुटुंबाला पुढे नेण्याची जबाबदारी तिने स्वीकारली. पण या सर्वांमध्ये मुलाबाळांच्या शिक्षणाची ही फरफट होऊ नये म्हणून त्यांनी सरांना बोर्डिंग ला ठेवण्याचा निर्णय घेतला. अशात सर्वात खडतर शिक्षण घेण्याची वेळ सरांवर आली, तिथले नियम इतके कडक होते की, बालपणातच काळ्या पाण्याची शिक्षा ही त्या लेकरांना अनुभवायला मिळत होती. बोर्डिंग आवार साफ करणे, आपण राहतो-झोपतो ती जागा स्वतः शेन शोधून आणून सारवणे आणि सगळ्यात घृणा आणणार काम म्हणजे गटार साफ करणे.. अंगभर कपडे नाहीत की दप्तर नाही, दोन बंदांची पिशवी म्हणजे दप्तर आणि दारूची क्वाटर म्हणजे वॉटर बॅग..!
एवढ्यावर हे सगळ थांबून राहत नाही.. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे तिथल जेवण.. तिथली भाकरी म्हणजे नुसता चाळ आणि त्यात अजून कहर म्हणजे कोळसा आणि दगड यांची भर.. त्यात आमटी म्हणजे नुसत पाणी..! अशावेळी आईच्या हातच्या मिळालेल्या कोरभर भाकरी ची किंमत पंचपक्वानांना मागे सारेल इतकी होती. अन् शिक्षा अशी की दावणीला बांधलेल्या जनावराला पण कमी मार मिळत असेल.
पण तिथे सुद्धा, आहे त्या परिस्थितीचा कधी स्वीकार करत, कधी त्या परिस्थितीला हरवत, मजल दरमजल करत, मित्राच्या मदतीने कंस्ट्रक्शन क्षेत्रामध्ये पाय टाकला.. कारण शिक्षण पण करायचं होतं आणि घरातला मोठा मुलगा म्हणून जबाबदारीचं ओझं पण पेलवायच होतं..!
बघता बघता या क्षेत्राची आवड निर्माण झाली, स्वतःचं १० x १० चं छप्पराच घर असणारा मुलगा लोकांचे स्वप्नवत घर चांगलं कसा उभारता येईल त्यासाठी प्रयत्न करू लागला.
कामाची कुतूहलता वाढली, शिकण्याची जिद्द वाढली आणि एखाद्या इंजिनियर ला सुद्धा लाजवेल इतका अफाट ज्ञानाचा साठा त्यांनी वाढवला. मग २००४ मध्ये एका आर्किटेक्टनी डायरेक्ट पार्टनरशिप बद्दल विचारणा केली, “बघा मजूर ते पार्टनरशिप” ते पण एका आर्किटेक्टसोबत” एवढा मोठा यशाचा टप्पा..! पण वाटतं तितकं सोपं नाही बर का..
अर्धे अर्धे भांडवल गोळा करून व्यवसाय सुरू झाला, व्यवसाय वाढत गेला पण भांडवल कमी पडू लागलं, अपेक्षा वाढू लागली, भांडणाचा डोंगर नको म्हणून दोनच वर्षात स्वतंत्र व्हाव लागल.
“दोन मालकाची एक बैलगाडी, बैलगाडीची वाटणी झाली, त्या बैलगाडीचं एकच चाक घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती.. किती ही क्रूर नियती..”
“पण मनातून एक आवाज येत होता – तू फक्त लढ.. तू फक्त लढ..”
घरातला मोठा मुलगा, पण जबाबदारी मात्र ते एका बापाची पार पाडत होते, बहिणीचं लग्न , भावाच्या शिक्षणाची जबाबदारी.. यासाठी चाललेली त्यांची तळमळ आणि या सर्वात पण चालू ठेवलेला त्यांचा व्यवसाय…!
भावाचं शिक्षण झाल्यावर ‘निलेश माने अँड असोसिएटस्’ची स्थापना झाली, पण पहिल्या ३ महिन्याचा टर्नओव्हर फक्त १५०० रुपये होता, त्यामुळे भावाचा हिरमोड झाला, कारण पुण्यात जॉब केल्यानंतर मिळणाऱ्या पैशांपुढे हे पैसे काहीच नव्हते..
पण सूक्ष्म विचार आणि मोठे ध्येय बाळगणारे आमचे सर हार मानायला काही तयार नव्हते.. कारण कोणतेही काम करायचं किंवा यश मिळवायचं म्हणलं की अगोदर फेल्युअर हे येणारच… हा सृष्टीचा नियम आहे. आणि पुढच्या सहा महिन्यातच असा जम बसला की जेवायला सुद्धा वेळ मिळत नव्हता.
“एक आयडिया माणसाचे नशीब बदलवू शकते यात काहीच शंका नाही..!” याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘यश वास्तु’चे झपाट्याने वाढत असणारे ‘फाउंटन’ आणि ‘क्रिस्टल’ सारखे प्रोजेक्ट..
“मन सुद्ध तुझं गोष्ट आहे किती रे मोलाची..
तू चाल पुढं, तुला र गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची..!
झेंडा भल्या कामाचा तू घेऊन निघाला..
काटकुट वाट मंदी बोचती त्येला, रगात निघत तरीबी हसत, शाब्बास लेका..
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची .. पर्वा बी कुनाची..!”
– लेखक – यश वास्तु टीम
Get Your Free Consultation
We convert your ideas into reality with perfect plan, budget, design, organizing and successful implementation.